
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरूवात
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरूवात होत आहे, हिवाळी अधिवेशनात पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आजपासून १४ डिसेंबरदरम्यान होणारे विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारच्या बाजूनेही तोडीस तोड उत्तर देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार आहेत. तर यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार प्रमुख मोर्चे विधानसभेच्या दिशेने कूच करणार आहेत.विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला असताना दुसऱ्या बाजूने जनतेच्या मागण्याचा आगडोंब उसळणार असल्याचे चित्र आहे. नागपूर शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात, वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याशिवाय चौकातील कॅमेऱ्याची नजर असेल सोबतच ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेऱ्याची नजर असेल.




