
‘गणपत वाणी बिडी पिताना’राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा
जगभरातील ५३६ मराठी कवींचा प्रतिसाद
चिपळूण :: येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभिनव स्वरुपाच्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातील ५३६ कवींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी कळवले आहे. स्पर्धेचा निकाल आणि विजेत्यांच्या गौरव निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन जानेवारी-फेब्रुवारी२०२६मध्ये विशेष कार्यक्रमात केला जाणार आहे.
या स्पर्धेसाठी कवींना बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिली ओळ “गणपत वाणी बिडी पिताना” देण्यात आली होती. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने राज्यभरातील कवींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता होती. तिचे प्रतिबिंब स्पर्धेतील कवींच्या सहभाग-प्रतिसादात उमटलेले दिसत आहे. या स्पर्धेत जगातील इंग्लंड, इस्त्रायल आदी देशांत वास्तव्याला असलेल्या मराठी कवींनी सहभाग नोंदवला आहे. तसेच बृहन्महाराष्ट्रचा विचार करता गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगणा राज्यांसह महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, अहिल्यानगर, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, ठाणे, धाराशिव, धुळे, नवी मुंबई, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, भंडारा, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यातील कवींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात चिपळूण येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होणाऱ्या जिल्हा युवा संमेलनांतर्गत एका विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे अभिनव स्वरूप राहिलेल्या या स्पर्धेला पहिल्या प्रयत्नात अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी जगभरातील सर्व सहभागी मराठी भाषिक कवींना धन्यवाद दिले आहेत.




