
मुंबई-गोवा महामार्गावरील भर रस्त्यात वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले
मुंबई-गोवा महामार्गावरील भर रस्त्यात वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः भरणे जगबुडी पुलावर अवजड वाहने भर रस्त्यात बंद पडत असल्याने वाहतुकीत अडसर उभा ठाकत आहे. यामुळे अन्य वाहनचालकांची डोकेदुखी कायम आहे.
आधीच दाट धुक्यामुळे मार्गाचा अंदाज येत नाही. त्यात भर रस्त्यातच बंदावस्थेतील उभ्या वाहनांचीही भर पडत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. बंद पडणार्या वाहनांच्या इशार्यासाठी केवळ फांद्यांचा उतारा केला जात असल्याने वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला असला तरी ठिकठिकाणी अडथळ्यांचा स्पीडब्रेकर कायम आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळणासह घाटांच्या पायथ्याशी अपघाताच्या मालिकांचे सत्र सुरूच आहे. विशेषतः अवजड वाहनांना घडणार्या अपघातांमुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे सारे प्रयत्न फोल ठरत आहेत.www.konkantoday.com




