
रत्नागिरीत रविवारी न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिर
सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने रत्नागिरीकरांसाठी न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर येत्या रविवारी (१७ मे) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शहरातील शिर्के हायस्कूल येथे होणार आहे.
अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोलारिस हॉस्पिटलने आतापर्यंत १०० हून अधिक मेंदूमध्ये गाठी झालेल्या रुग्णांना “जीवनदान” दिले असून सर्व रुग्णांची प्रकृती अत्यंत चांगली आहे. हीच नेव्हिगेशन तंत्रज्ञान प्रणाली मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठीही वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे मणक्यात स्क्रू अधिक अचूकपणे बसविण्यास मदत होते. स्पाईन फिक्सेशन शस्त्रक्रियेदरम्यान स्क्रू कोणत्या दिशेने आणि कोणत्या आकाराचे बसवायचे याचे अचूक मार्गदर्शन या तंत्रज्ञानाद्वारे शल्यचिकित्सकांना मिळते.
ज्यांना दीर्घकालीन डोकेदुखी, चक्कर येणे, व्हर्टिगो, फिट्स, नैराश्य, चिंता, पाठदुखी, मानदुखी, मेंदू व मणक्यांच्या गाठी, न्यूरोपॅथी, हालचाल व संतुलनाशी संबंधित विकार, मायस्थेनिया ग्रॅव्हिस आदी समस्या आहेत. अशा रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड-टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ अर्बानिया, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी विवेक महाकाळ ८६५५६९६४९६ / पुरुषोत्तम पवार ८४३३५२९४३५ यांच्याशी संपर्क साधावा.
सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे म्हणाले, “आम्ही ट्यूमर काढण्यासाठी न्यूरो-नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला. न्यूरो नॅव्हिगेशन हे मेंदूसाठी जीपीएससारखे आहे, ते रिअल-टाइम इमेजिंगच्या मदतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना ट्यूमर किंवा समस्या असलेल्या भागांवर अचूकपणे लक्ष्य साधण्यासाठी मार्गदर्शन करते. हे प्रगत तंत्रज्ञान मेंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, कमी गुंतागुंतीची आणि अधिक अचूक बनवते, तसेच महत्त्वाची कार्ये सुरक्षित ठेवते आणि रुग्णाचे आरोग्य सुधारते. न्यूरो नॅव्हिगेशनमुळे रुग्णांना उत्तम अचूकता, कमीत कमी छेद, कमी आघात आणि जलद बरे होण्यास मदत होईल. मेंदूमधील ट्यूमरच्या शस्त्रक्रियांव्यतिरिक्त, हे नॅव्हिगेशन उपकरण मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्येही अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे स्क्रू चुकीच्या जागी बसणे, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड गळती, ड्युरल इजा इत्यादींशी संबंधित गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर ६ तासांच्या आत लक्षणीय सुधारणेसह हालचाल करता येते.”
अवघ्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत सोलारिस हॉस्पिटलने न्यूरॉलॉजी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वेगाने प्रगती करत आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे आणि न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे या दोघांनी मिळून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे जागतिक दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात.




