
आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण
१५ मे रोजीच्या मोर्चापूर्वी सरकार सकारात्मक : आज दुपारी होणार महत्त्वाची बैठक
रत्नागिरी : आंबा आणि काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर सकारात्मक पाऊल उचलले असून आंबा बागायतदारांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज दुपारी ३ वाजता आंबा उत्पादक शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत , काँग्रेसचे आमदार भाई जगताप तसेच माजी आमदार बाळ माने यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
आंबा, काजू शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले होते. याच पार्श्वभूमीवर १५ मे रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत अपुरी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि काँग्रेस यांनीही प्रस्तावित मोर्चाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.




