मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस-रिक्षाचा भीषण अपघातरिक्षातील दोघे जखमी : २३ प्रवासी थोडक्यात बचावले


संगमेश्वर तालुक्यातील धामणी रेल्वे स्टेशनजवळ खासगी लक्झरी बस आणि रिक्षा यांच्यात मंगळवारी झालेल्या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, बसमधील २३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. बस रस्ता सोडून थेट बाजूच्या दरडीवर आदळल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास रिक्षाचालक अभिजीत संजय गमरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच-०८-बीसी २०३५) घेऊन रेल्वे स्टेशनकडून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. याच वेळी बस चालक मुस्तफा राजासाब गारमपल्ली हे खासगी ट्रॅव्हल्स बसमधून (क्र. एमएच-०१-ईएल-५४९५) विजयदुर्ग येथून २३ प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने आपल्या मार्गावरून जात होते; मात्र समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या नादात बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रिक्षाला जोरदार धडक देऊन थेट रस्त्याशेजारील गटारात उतरली. सुदैवाने रस्त्याच्या बाजूला दरड असल्याने बस त्यावर आदळून थांबली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरात घबराट पसरली. बसचा मुख्य दरवाजा उघडणे शक्य नसल्याने स्थानिकांनी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. या अपघातात रिक्षाचालक अभिजीत गमरे आणि प्रवासी कुणाल सुरेंद्र कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यापूर्वीच पत्रकार वहाब दळवी आणि राजू पटेल यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम केले. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button