महाड एमआयडीसीतील वायुगळतीने दोघांचा मृत्यू; ६० जण बाधित, औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न


महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीत विषारी वायुगळती झाल्याने दोन जणांचा मृत्यू, तर सुमारे ६० जण बाधित झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शनिवारी दुपारच्या शिफ्टमध्ये इंडो अमाईन्स कंपनीत २६ कामगार उपस्थित होते. यापैकी तिघांना वायुगळतीची बाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये इंडो अमाईन्समधील अमित राज तसेच विरल कंपनीतील अल्पेश वांद्रे (रा. बोरगाव, ता. महाड) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

वायुगळतीनंतर कंपनीतील परिस्थिती गंभीर बनली. सुमारे ६० जणांना त्याचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दुर्घटनेच्या वेळी कंपनीत जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

महाडचे माजी उपसभापती चंद्रकांत बुवा जाधव यांच्या माहितीनुसार, कंपनीसमोरील विनती ऑरगॅनिकमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

गंभीर दुर्घटना घडूनही कंपनीत जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप झाल्याने औद्योगिक सुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपन्यांकडून आवश्यक खबरदारी घेतली जाते का, तसेच सुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम आहे, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button