दाभोळ खाडीत पर्यटन हाऊसबोट सेवेला प्रारंभ; महिलांच्या सक्षमीकरणाला चालना

रत्नागिरी;- जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि विस्तीर्ण दाभोळ खाडी आता पर्यटनाच्या नव्या उंचीवर झेप घेत असून, खाडीत पर्यटन हाऊसबोट सेवेला औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या हाऊसबोट उपक्रमाचे लोकार्पण दाभोळ धक्क्यावर उत्साहात पार पडले.


केरळच्या धर्तीवर दाभोळ खाडीतील बॅकवॉटरचा पर्यटनासाठी वापर करण्यात येत असून, या माध्यमातून पर्यटकांना खाडीतील निसर्गसौंदर्य, शांत वातावरण आणि समुद्री पर्यटनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. दाभोळ खाडीतील जलपर्यटनामुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमातून महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार मिळून त्यांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
स्थानिक युवकांनाही पर्यटनाशी संबंधित रोजगार निर्माण होणार असून, दाभोळ परिसरातील आर्थिक घडामोडींना गती मिळणार आहे. एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे महिला सक्षमीकरण असा दुहेरी उद्देश या प्रकल्पातून साधला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक दाभोळ खाडी आता राज्याच्या पर्यटन नकाशावर नव्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button