
आरवली बोगद्यातून जाताना ‘दिवा-सावंतवाडी’ ट्रेनमध्ये अचानक खिडकीच्या काचा फुटल्या
कोकण रेल्वेमार्गावर आरवली बोगद्यात मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्या ‘दिवा-सावंतवाडी’ रेल्वेच्या डब्यांच्या काचा फुटल्यामुळे बुधवारी गोंधळ उडाला होता. या प्रकारात गाडीच्या खिडक्यांच्या काचा फुटून त्याचे तुकडे डब्यात उडाले.त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही; मात्र सतर्क ‘कोरे’ प्रशासनाने तत्काळ गाडी थांबवून प्रकाराची पाहणी केली तसेच डब्यामध्ये पडलेले काचेचे तुकडे साफ केले. त्यानंतर गावी पुढे रवाना झाली. याला कोकण रेल्वेकडून दुजोरा मिळाला आहे.
मुंबईकडून येणारी दिवा-सावंतवाडी ट्रेन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरवली स्थानकाच्या आधी असलेल्या बोगद्यातून मार्गक्रमण करत होती. गाडी बोगद्यात असतानाच अचानक मोठा आवाज झाला. गाडीच्या पाचव्या आणि सातव्या जनरल डब्यात हा प्रकार घडला.या आवाजाने पाचव्या डब्यातील खिडकीजवळ बसून प्रवास करत असलेली एक महिला प्रवासी अचानक ओरडली. सुदैवाने, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही; मात्र, या अचानक घडलेल्या प्रकारामुळे डब्यात एकच हाहाकार उडाला आणि भयभीत झालेल्या प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून गाडी तत्काळ आरवली स्थानकावर सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आली.
रेल्वेचे कर्मचारी आणि कामगार तातडीने डब्यांमध्ये पोहोचले. त्यांनी डब्यात विखुरलेले काचेचे सर्व तुकडे गोळा करून डब्यांची तातडीने स्वच्छता केली. प्रवाशांची सुरक्षितता निश्चित केल्यानंतरच गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. पुढील स्टेशनवरही रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुन्हा डब्यात येऊन पाहणी केली.मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यामध्ये गाडी आली असता सेंट्रिंगचा लोखंडी पार्ट गाडीच्या काचेवर आदळला. त्यामुळे काच फुटली आणि मोठा आवाज झाला. या प्रकारानंतर गाडी थांबवून सर्व पाहणी करण्यात आली. तसेच सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे ‘कोरे’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.




