
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सहा कंपन्या बंद करा, सोनगाव ग्रामस्थांचा एल्गार
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांकडून सोडण्यात येणार्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे त्रस्त झालेल्या सोनगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) चिपळूण येथील प्रादेशिक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दिवसभर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ’सहा कंपन्या बंद करा, तरच आम्ही येथून जाऊ,’ असा एल्गार पुकारला. प्रशासनाविरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी खासदार हुसेनभाई दलवाई, आ. भास्कर जाधव यांनी देखिल उपस्थिती दर्शविली.
वारंवार निवेदने देऊन आणि प्रत्यक्ष भेटून होणार्या प्रदूषणाबाबत चर्चा करूनही सोनगाव येथील ओढ्याला दूषित पाणी सोडले जाते. यावर अधिकारी कोणतीच ठोस भूमिका घेत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. दि. ७ जुलै २०२६ रोजी लोटे एमआयडीसीमधील काही कंपन्यांमधून अत्यंत घातक रासायनिक सांडपाणी सोनगावमधून वाहाणार्या ओढ्यात सोडण्यात आले होते. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकारामुळे गावातील शेती, मच्छिमार व्यवसाय आणि दुग्धव्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.




