
बिहारमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना; अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू!
बिहारमधील लखीसराय येथील अशोक धाम मंदिरामध्ये श्रावणी सोमवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून डझनभर भाविक जखमी झाले आहेत.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी सोमवारी सकाळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही घटना घडली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड गर्दीच्या वेळी मंदिरात सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अशोक धाम रेल्वे स्टेशनला मंदिराशी जोडणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. रात्रीच्या वेळी या मार्गावर विजेचा खांब पडल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली होती. या पडलेल्या खांबात विद्युत प्रवाह असल्याची अफवा पसरल्यामुळे सोमवारी सकाळी भाविकांमध्ये गोंधळ उडाला. भाविक वेगवेगळ्या दिशेने धावू लागल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
या गोंधळात अनेक जण एकमेकांवर पडले आणि स्थानिक रहिवासी तसेच इतर भाविकांनी गर्दीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या सर्व भाविक महिला असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी लखीसराय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी मदत व वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य आणि बचाव पथकेही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जखमींना मदत करत आहेत.
या मंदिरात अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१९ मध्ये श्रावण यात्रेदरम्यान मंदिरात झालेल्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या अशोक धाम मंदिरला श्री इंद्रदमनेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखलं जातं, हे बिहारमधील एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे आणि पवित्र श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.




