खेर्डीत ‘खेळ पैठणी’चा जल्लोष

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या उपस्थितीत ३५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : रवीना गिरामे ठरल्या इलेक्ट्रिक बाईकच्या मानकरी

चिपळूण : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणी’ हा भव्य आणि रंगतदार कार्यक्रम रविवारी खेर्डीत मोठ्या उत्साहात पार पडला. दत्तवाडी मित्र मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाला महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सुमारे ३५० महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे महिलांचा उत्साह आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. खेळ, गाणी, उखाणे, मनोरंजन आणि पैठणीच्या झगमगाटात संपूर्ण कार्यक्रम रंगून गेला.
स्पर्धेमध्ये विविध फेऱ्यांमधून महिलांनी आपली कला, आत्मविश्वास आणि उत्साह दाखवून दिला. अंतिम फेरीत रवीना गिरामे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जिंकली. द्वितीय क्रमांक सीमा ढवळे यांनी मिळवत फ्रीजवर आपले नाव कोरले. विजेत्यांची घोषणा होताच उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान कार्यक्रमाचे यश अधोरेखित करणारे ठरले.
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे तसेच आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक केले. “महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि अशा व्यासपीठांमुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. चिपळुणात पहिल्यांदाच आल्याचे सांगत त्यांनी येथील महिलांचा उत्साह आणि कार्यक्रमातील सकारात्मक वातावरणाचेही कौतुक केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ आणि युवा उद्योजक अजिंक्य पवार यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.
आमदार भास्कर जाधव यांनीही कार्यक्रमाला भेट देत आयोजकांचे मुक्तकंठाने कौतुक केले. “कार्यक्रम अनेकजण आयोजित करतात; मात्र स्वतःच्या खर्चातून इतका भव्य आणि दर्जेदार कार्यक्रम उभा करणे सोपे नाही. महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेणे ही कौतुकास्पद बाब आहे. अजिंक्य पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.
दत्तवाडी मित्र मंडळाने कार्यक्रमासाठी केलेले चोख नियोजन सर्वांच्याच पसंतीस उतरले. नावनोंदणी, स्पर्धांचे नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, ध्वनीव्यवस्था, आसनव्यवस्था तसेच बक्षीस वितरण या प्रत्येक बाबी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. महिलांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
खेर्डीत रंगलेल्या या ‘खेळ पैठणी’ कार्यक्रमामुळे महिलांना मनोरंजनासोबतच स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा रविवार महिलांसाठी खऱ्या अर्थाने ‘स्पेशल’ ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button