डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीस कोमसापचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार प्रदान

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २०२४ च्या पुस्तकांना प्रदान करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा केशवसुत स्मारक, मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी भूषवले.
याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील
कार्यवाह माधव अंकलगे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या अथर्व पब्लिकेशन, जळगाव प्रकाशित ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीस वि. वा. हडप स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र यांचा समावेश होता. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते डॉ. लबडे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
‘चिंबोरे युद्ध’ ही आगळीवेगळी, रूपकात्मक कादंबरी असून तिला आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक दामोदर मावजो यांनी या कादंबरीबद्दल मत व्यक्त करताना सांगितले की, “ही कादंबरी मराठी साहित्यातील उत्तराधुनिक आणि पोस्ट-ट्रुथ कालखंडाचे प्रतिनिधित्व करणारी आहे.”
ज्येष्ठ समीक्षक दीपक बोरगावे यांनी ही कादंबरी “अकथ्य कथ्य करणारी” असल्याचे नमूद केले, तर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी तिला “महामिथक असलेली आगळीवेगळी कादंबरी” असे गौरविले. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी या कादंबरीची दखल घेतली असून, ‘चिंबोरे युद्ध’ ही कादंबरी हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवादित झाली आहे, तर इंग्रजी अनुवाद सध्या सुरू आहे.
डॉ. बाळासाहेब लबडे यांची आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यात चार कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, तीन समीक्षाग्रंथ, सहा संपादित पुस्तके आणि एक अनुवादित ग्रंथ यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या गीतांना मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रियता लाभली आहे. ते सध्या पीएचडी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रसंगी अध्यक्षा सौ. नमिता कीर म्हणाल्या, “डॉ. बाळासाहेब लबडे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले लेखक असून त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याला नवा उंचाव दिला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा त्यांना अभिमान आहे.”
या पुरस्काराबद्दल डॉ. बाळासाहेब लबडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button