
प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणार्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषध विक्रेत्यांवर कारवाई
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणार्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषध विक्रेत्यांवर एफडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान १९ लाख ६५ हजार रुपयांचा कफ सिरपचा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये विषारी घटक असलेल्या कफ सिरपच्या सेवनाने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर एफडीने राज्यात विशेष तपास मोहीम सुरू केली. कोकण विभागात घेतलेल्या २१३ तपासण्यांपैकी ९८ विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री केल्याचे घड झाले आहे.
या तपासात ठाणे जिल्ह्यातील ५९, पालघरमधील १४, रायगडमधील ११, रत्नागिरीतील १० आणि सिंधुदुर्गातील ४ औषध विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. तसेच कोकणातील १२१ कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. या कारवाईत ठाणे जिल्ह्यातून १७ लाख ७९ हजारांचा, रायगडमधून २० हजारांचा, रत्नागिरीमधून ६१ हजारांचा आणि सिंधुदुर्गातून एक लाख रुपयांचा कफ सिरप साठा प्रतिबंधित करण्यात आला आहे. नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे एफडीए अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com




