शारदादेवी मंदिर–अबिटगाव जोडरस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी?

५० लाखांचा निधी मंजूर, तरी निविदा रखडली; जि.प. सदस्या शिवानी सावंत आक्रमक

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथील श्री शारदादेवी मंदिर रामवाडी ते अबिटगाव या जोडरस्त्याच्या सुधारणेसह डांबरीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

तुरुंबव येथील श्री शारदादेवी मंदिरात यात्रा सुरू असून, दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र, मंदिर रामवाडी ते अबिटगाव या जोडरस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. असे असतानाही निविदा प्रक्रिया रखडल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. निधी मंजूर असताना कामात होणारी दिरंगाई गंभीर असून, निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्याच्या सुधारणेसह डांबरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, निविदा प्रक्रियेला विलंब होण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही सावंत यांनी निवेदनातून केली आहे.

यात्रेच्या काळात भाविकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. मंजूर निधी असूनही काम रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने यापुढेही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे शिवानी सावंत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button