२५० किमीच्या सागरी मोहिमेसाठी महाराष्ट्राचे ६० एनसीसी कॅडेट्स सज्ज!


रत्नागिरीतील १० दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण; ‘कोकण ज्ञान तरंग’ मोहिमेतून शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा जागर


रत्नागिरी : महाराष्ट्र एनसीसीच्या १२० कॅडेट्सनी रत्नागिरी येथे आयोजित दहा दिवसांचे ‘प्री-मेन्यू’ प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केले. आगामी ‘मेन्यू २७’ ओपन सी सेलिंग मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रशिक्षणातून निवडलेल्या ६० कॅडेट्सची आता २५० किलोमीटरच्या सागरी प्रवासासाठी निवड झाली आहे. रत्नागिरी ते पालशेत आणि पुन्हा रत्नागिरी असा या मोहिमेचा नियोजित मार्ग असणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील एनसीसी ग्रुपमधील १०४ नेव्हल, १४ आर्मी आणि २ एअरफोर्स अशा एकूण १२० कॅडेट्सनी या शिबिरात सहभाग घेतला. विविध दलांतील कॅडेट्सनी एकत्रित प्रशिक्षण घेत त्रि-सेवा एकात्मतेचे दर्शन घडवले.

दहा दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना २७ फूट लांबीच्या ‘डीके व्हेलर’ नौका चालवणे, रोईंग आणि सागरी नौकावहनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय रॅपलिंग आणि पॅरासेलिंगसारख्या साहसी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला.

‘कोकण ज्ञान तरंग’मधून सामाजिक संदेश

यंदाच्या ‘मेन्यू २७’ मोहिमेची संकल्पना ‘कोकण ज्ञान तरंग’ अशी असून, ‘ज्ञान आणि प्रगतीची धरून कास – आदर्श कोकणाचा करूया विकास’ हे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे. सागरी प्रवासासोबतच सामाजिक जनजागृती करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे.

निवड झालेले कॅडेट्स कोकण किनारपट्टीवरील विविध भागांत पथनाट्ये सादर करून मोफत व सक्तीचे शिक्षण, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती करणार आहेत. त्यामुळे ही मोहीम केवळ साहसी सागरी प्रवास न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ठरणार आहे.

कॅडेट्स समुद्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासोबतच सामाजिक बदलाचे दूत म्हणूनही कार्य करतील, असा विश्वास कमांडिंग ऑफिसर यांनी व्यक्त केला.

सागरी जैवविविधतेचीही करून घेतली ओळख

प्रशिक्षणाचा भाग म्हणून सर्व १२० कॅडेट्सना रत्नागिरीतील मत्स्यालय आणि खाडी परिसरातील खारफुटी क्षेत्राची शैक्षणिक भेट घडविण्यात आली. या भेटीतून कॅडेट्सना सागरी जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि खारफुटीच्या परिसंस्थेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या शैक्षणिक उपक्रमासाठी फिशरीज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज, शिरगाव आणि आसामंत फाउंडेशन यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल एनसीसी महाराष्ट्राच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर निवड झालेले ६० कॅडेट्स आता २५० किलोमीटरच्या सागरी मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. साहस, शिस्त, पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या मोहिमेतून कोकण किनारपट्टीवर शिक्षण व महिला सक्षमीकरणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button