
निधीची तरतूद होईपर्यंत जुनी नगरपरिषद इमारत पाडू देणार नाही!
भास्कर जाधव यांची ठाम भूमिका; हेरिटेज वास्तू म्हणून जतन करण्याची मागणी
चिपळूण : विकासाच्या कामात कधीही राजकारण आणले नाही. माझ्या बाबतीत मात्र अनेकांनी राजकारण केले. तरीही मी माझ्या राजकीय कारकिर्दीत विकासाच्या आड कधीही आलो नाही. मात्र, चिपळूण नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या बाबतीत पुरेसा निधी उपलब्ध होईपर्यंत ही इमारत पाडू नये, अशी ठाम भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी घेतली आहे. नगरपरिषदेला यासंदर्भात पत्र देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. नगरपरिषदेला १६ डिसेंबरपर्यंत दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने तोपर्यंत ही इमारत पाडू देणार नाही, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
चिपळूण नगरपरिषदेची सध्याची इमारत ‘जुनी शेंगदाणा बिल्डिंग’ म्हणून ओळखली जाते. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन असल्याचे समजते. मात्र, नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण अपेक्षित खर्चाच्या किमान ५० टक्के निधीची ठोस तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय सध्याची इमारत पाडण्याचा विचार करू नये, अशी मागणी आमदार जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
सुमारे १५० वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन ही इमारत आजही दिमाखात उभी आहे. याउलट, नगरपरिषदेने त्यानंतर बांधलेली दुसरी इमारत अवघ्या २५ ते ३० वर्षांत निकामी झाल्याने ती पाडावी लागली. त्या ठिकाणी अद्याप नवीन बांधकाम सुरू झालेले नाही. या अनुभवातून धडा घेऊन भविष्यातील बांधकामाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
चिपळूणमधील मटण मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मंडई, शासकीय विश्रामगृह आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा वास्तूंचा पूर्वेतिहास आणि सद्यस्थिती नागरिकांसमोर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जुन्या इमारतीबाबत निर्णय घेताना घाई न करता तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थितीचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
या विषयावर शहरातील ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी नागरिकांना विश्वासात घेऊन पक्षविरहित बैठक आयोजित करावी. नवीन इमारतीचा आराखडा, अंदाजित खर्च, निधीची उपलब्धता आणि बांधकामाचा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
नगराध्यक्ष निश्चितच संपर्क साधून बैठक आयोजित करतील. त्या बैठकीत मी माझी सविस्तर भूमिका मांडणार आहे. ही इमारत अद्याप सुस्थितीत असल्याने तिचे ऐतिहासिक महत्त्व जपत हेरिटेज वास्तू म्हणून जतन करण्याचा विचार व्हावा. नगरपरिषदेला दीडशे वर्षे पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत, ही इमारत पाडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.




