शेनाळे घाटात तीन ठिकाणी दरडी; वाहतूक बंद, पर्यायी मार्गाने वळवली


मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेनाळे घाटात बुधवारी दुपारी तीन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी महाड, माणगाव, मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गावर वळवली आहे.

देशमुखवाडी परिसरात डोंगराचा भाग खचून माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होण्यास आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मंडणगड–पाट–म्हाप्रळ–शेनाळे सडे–कोंडमालुसरे या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

दरडी कोसळल्याच्या घटनेने २००६ मधील भीषण भूस्खलनाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या दुर्घटनेनंतर शेनाळे घाट तब्बल दीड ते दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता.

दरम्यान, तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका इतर भागांनाही बसला आहे. भारजा नदीला आलेल्या पुरामुळे कुंबळे–तिडे–तळेघर मार्ग पाण्याखाली गेला असून दाभट–मुरादपूर परिसरातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. तुळशी–माहू घाटातही तीन ते चार ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. भिंगळोली समर्थनगर येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून काही घरांचे नुकसान झाले आहे.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी मंडणगड तालुक्यात ७१.२५ मिमी पावसाची नोंद झाली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावर प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button