
पाणीटंचाई नियोजनाबाबत जयगड परिसरातील ग्रामपंचायतींची सभा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती उषा राजेश सावंत यांनी काल (१३ ऑक्टोबर) पाणीटंचाई नियोजनाबाबत रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण येथे जयगड, साखरमोहल्ला, नांदिवडे, कासारी, वाटद, रीळ, वरवडे, गडनरळ, सैतवडे, गुंबद, कळझोंडी या ग्रामपंचायतीचे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, संबंधित ग्रामस्थ यांची सभा दुपारी दोन वाजता आयोजित केली होती.

या सभेच्या अध्यक्षा श्रीमती उषा राजेश सावंत होत्या. त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्या सौ. अनुष्का अभय खेडेकर, सौ. संजना उदय माने, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता श्री. दाभोळकर, उपअभियंता देखभाल दुरुस्ती कक्ष (जिल्हा परिषद रत्नागिरी) प्रसाद मेलगे, शाखा अभियंता देखभाल दुरुस्ती किशोर केळसकर, शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रत्नागिरी श्री. नांदगावकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती (ग्रामपंचायत) पुरुषोत्तम सुर्वे, कृषी अधिकारी तथा जयगडचे प्रशासक अक्षय शिंदे आदी मान्यवर होते. त्याचप्रमाणे जयगड ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध कमलाकर साळवी (माजी सरपंच), जयगडचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल बाळू कांबळे, जांभारी सरपंच आदेश पावरी, सत्कोंडीचे सरपंच सतीश थूळ आदी ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामपंचायतचे विद्यमान प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, कळझोंडी धरणाचे पाणी योजनेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाने ही पाणीटंचाई नियोजनाबाबत सभा घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर आतापासूनच मात करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. दाभोळकर म्हणाले, कळझोंडी धरण दुरुस्त होण्यापूर्वी जेवढा पाणीसाठा होता, त्यापेक्षा आता दुरुस्तीनंतरचा पाणीसाठा हा जवळजवळ तिप्पट आहे. तरीसुद्धा भावी काळात जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून, शासनाने परिपत्रक (जीआर) काढून योग्य ती काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
यावेळी अनिरुद्ध साळवी यांनी सांगितले की, शासनाच्या जीआरप्रमाणे सर्वप्रथम अस्तित्वातील जलवाहिन्यांची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने योग्य ते तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन करावे. सर्वसामान्य जनतेच्या वाटणीचे पाणी वाहून जाणे हे या टंचाईच्या काळात परवडण्यासारखे नाही. तसेच जयगड गावासाठी कायमस्वरूपी स्थानिक जल योजना अर्थात तलाव निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने तांत्रिक सहकार्य करावे. आत्तासारखी पाणीटंचाईची परिस्थिती भविष्यातही उद्भवू शकते यामुळे यावर गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. जयगड, साखरमोहल्ला, सैतवडे, जांभारी आदी भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य फार पूर्वीपासून आहे. या गावात पिण्याचे पाण्याचे उद्भव जवळजवळ नाहीत. त्यामुळे या गावातील जनतेला पाणीटंचाईच्या काळात दिलासा देण्यात आलाच पाहिजे.
यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे उपस्थित सर्व संबंधितांनी आपापल्या गावातील प्रस्ताव सादर केले. लवकरच याबाबत पुढील विचार विनिमय सभा होणार आहे. एकूण शासनाने, प्रशासनाने आणि समस्त जनतेने ही पाणी टंचाईची समस्या गांभीर्याने घेतल्याचे दिसते. या सभेचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम सुर्वे यांनी केले.




