
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ‘लोगो’ व ध्वज अनावरण सोहळा बुधवारी मालगुंड येथे
रत्नागिरी, दि. १३ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाची नांदी होत असून, संमेलनाचा अधिकृत ‘लोगो’ (बोधचिन्ह) व ध्वज अनावरण सोहळा बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक ३ वाजता कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे होणार आहे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या पावन कर्मभूमीत, मालगुंड येथे येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हे भव्य मध्यवर्ती साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून उद्या हा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, मालगुंडच्या सरपंच श्वेता शेखर खेऊर आणि गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. आनंद शेलार (जिल्हाध्यक्ष, कोमसाप रत्नागिरी), गजानन पाटील (कार्यवाह, १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन) आणि अभिजित हेगशेट्ये (कार्याध्यक्ष, १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन) यांनी साहित्यप्रेमी, रसिक वाचक व नागरिकांना या दिमाखदार सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



