
ज्ञानेश कुमारांविरोधातील लढ्यात फूट पाडण्याचा डाव’; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, विरोधकांना एकजुटीने लढण्याचं केलं आवाहन!
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून देशभरात विरोधक आंदोलन करत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एक मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडीच्या मोर्चावर अप्रत्यक्ष भाष्य करत केंद्र सरकार आपल्याला (इंडिया आघाडी आणि सीजेपी) एकमेकांविरोधात उभं करत आहे, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. पण आपण आपण एकजुटीने उभं राहायला हवं असंही दिपके यांनी म्हटलं आहे.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
‘जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी मिळाली, तेव्हा अनेकांनी लगेच असे तर्क मांडले की आम्हाला भाजपानेच मुद्दाम तिथं पाठवलं होतं. ‘इंडिया’आघाडीने काल एक मोठं आंदोलन केलं, पण १० ऑक्टोबरला आमच्या बाबतीत जशी कठोर कारवाई झाली, तसं इंडिया आघाडीबाबत काही घडलं नाही. केंद्र सरकार नेमकं याच पद्धतीने आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करतंय. वेगवेगळ्या आंदोलनांशी वेगवेगळ्या प्रकारे वागून देऊन ते अशा लोकांमध्ये संशय आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे मुळात एकाच ध्येयासाठी लढत आहेत’, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.
‘माझी सर्वांना एक विनंती आहे की, त्यांनी वापरलेल्या या युक्त्या आणि डावपेच ओळखा. आज ते एका आंदोलनाला परवानगी देऊ शकतात आणि दुसरं आंदोलन दडपू शकतात. उद्या ते या भूमिकांची अदलाबदलही करू शकतात. सत्तेत असलेल्यांना जाब विचारण्याऐवजी आपण एकमेकांवरच संशय घेत राहावं, हाच त्यामागचा उद्देश आहे’, असंही अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
When CJP was granted permission to protest, many were quick to float conspiracy theories that we were planted by the BJP.
Yesterday, the INDIA bloc held a massive protest, but there was no crackdown like the one we witnessed on October 10.
This is exactly how the govt plays us…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 13, 2026
‘कट-कारस्थानांच्या अशा चर्चांमुळे आपल्यात फूट पडू देऊ नका. जेव्हा आपण एकजुटीने उभं राहायला हवं, तेव्हा आपापसात भांडणात अडकू नका. हा लढा ज्ञानेश कुमार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध आहे, हे कधीही विसरू नका’, असं अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला उद्देशून म्हटलं आहे.
सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
कॉक्रोच जनता पार्टीचे तीन सदस्य आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा एकदा ताब्यात घेतलं होतं. हे तिघंही जंतर-मंरच्या दिशेने निघाले होते, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती. सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पोस्ट करत ही माहिती दिली. शनिवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं होतं.




