कोल्हापूरच्या पठ्ठ्याने अमेरिकेत इतिहास घडवला! विश्वजीत मोरे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणारा पहिलाच भारतीय!


  • कोल्हापूरच्या कुस्तीपटूने अमेरिकेत इतिहास घडवला आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या विश्वजीत मोरेने ऐतिहासिक कामगिरी केली.

ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. विश्वजितने उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव्हचा ७-४ असा पराभव करत ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता विजेतेपदासाठी त्याचा सामना जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेशी होणार आहे.

विश्वजितचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, त्याने एकामागून एक आव्हानात्मक सामने जिंकत आपलं नाव कुस्तीच्या इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. त्याने सुरुवातीला मेक्सिकोच्या आयझॅक मारिन माताचा १०-८ असा पराभव केला. त्यानंतर २० वर्षांखालील जागतिक विजेता आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इराणच्या आर्मिन शम्सीपूरला ८-१ अशी धूळ चारली. उपांत्य फेरीत रशियन प्रतिस्पर्ध्याला नमवत त्याने अंतिम फेरीचं तिकीट निश्चित केलं.

विश्वजितने यापूर्वीही आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने २०२४ आणि २०२५मध्ये सलग दोन वर्षे कांस्यपदक पटकावलं होतं. गेल्या वर्षी सर्बियातील नोव्ही साद येथे झालेल्या अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या सामन्यात त्याने कझाकस्तानच्या येरासिल ममायर्बेकोव्हचा ५-४ असा पराभव केला होता.

दरम्यान, स्पर्धेतील इतर भारतीय कुस्तीपटूंना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुषांच्या ६३ किलो वजनी गटात चेतनला अमेरिकेच्या एल. ड्र्युरीकडून पराभव पत्करावा लागला. ६७ किलो वजनी गटात सागर सिंह जपानच्या टी. सुझुकीकडून पराभूत झाला. सौरव राणा (७२ किलो) आणि करण कंबोज (८७ किलो) यांनाही आपापल्या सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पण कोल्हापूरच्या पठ्ठ्याने मोठ्या आव्हानांना तोंड मारत मैदान मारलं.
अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धा २०२६ मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात ग्रीको-रोमन प्रकारातील लढतींनी झाली आहे. त्यानंतर १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महिला कुस्तीचे सामने, तर १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील लढती पार पडणार आहेत.

या स्पर्धेसाठी भारताने एकूण २१ कुस्तीपटूंचा संघ पाठवला आहे. यामध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील १०, महिला फ्रीस्टाइल प्रकारातील ६ आणि ग्रीको-रोमन प्रकारातील ५ कुस्तीपटूंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button