
जरांगे पाटलांचे उपोषण मागे; ‘पॅरिस’मधून हलली सूत्रे!
उदय सामंतांच्या साडेतीन तासांच्या शिष्टाईनंतर आंदोलन स्थगित; शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची भूमिका घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पॅरिसमधूनच संवाद साधत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक आणि संशोधनासंदर्भातील परिषदेसाठी उदय सामंत सध्या पॅरिसमध्ये आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा सुरू ठेवली. या घडामोडींमध्ये सामंत यांनी जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांशीही संवाद साधल्याचे सांगण्यात येते.
दिवसभरात मुख्यमंत्र्यांशी सातवेळा चर्चा
आंदोलन स्थगित करण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिवसभरात किमान सात वेळा चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांनी सात वेळा चर्चा केली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि उदय सामंत यांच्यात कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा झाली. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांशी सामंत यांचा संवाद झाला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे, तसेच त्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने शिष्टमंडळ बीडकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे आंदोलनाचे केंद्र महाराष्ट्रात असले, तरी या संपूर्ण घडामोडींमध्ये ‘केंद्रबिंदू पॅरिस’ ठरल्याचा दावा उदय सामंत यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. साडेतीन तासांच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित होण्याच्या दिशेने मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर शासनाकडून पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आ




