संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात

५० हजारांची दुचाकी पोलिसांकडून जप्त; चिपळूणातील देसाई बाजार-पाग नाका परिसरातील कारवाई

चिपळूण, ता. १६ : देसाई बाजार-पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना आढळून आलेल्या १८ वर्षीय तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता. १४) दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान बशीर अहमद शेख (वय १८, रा. दिहवा सोनी, गोंडा, उत्तर प्रदेश) हा एमएच १४ एए २१३१ क्रमांकाची मोटारसायकल संशयास्पदरीत्या चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे वाहनाच्या मालकी हक्काबाबत तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत चौकशी केली. मात्र, वाहनाच्या मालकीबाबत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांक दिसून येत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button