रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा मिशन प्रबोधन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या सायबर क्राईम शाखेच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मिशन प्रबोधन हा सायबर गुन्ह्यांवर मात कशी करावी याची माहिती देणारा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रत्नागिरी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनटक्के यांनी भूषविले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव यांनी आणि त्यांचे सहकारी दशरथ कांबळे यांनी सायबर क्राईम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सविस्तर माहिती देताना त्यांनी व्हाट्सअपमध्ये सेटिंग करून आपले फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती कशी सुरक्षित ठेवायची, तसेच एखादा जुना मोबाईल विकताना तो कसा रिकामा करून घ्यावा, त्यामधील जी-मेल अकाउंट डिलीट करावे आणि मगच तो विकावा नाहीतर आपणच आपली माहिती फुकटात दुसऱ्या व्यक्तीस देत असल्याचे सांगितले. असे न केल्यास समोरची व्यक्ती आपले फोटो आणि नंबर यांचा कसा गैरवापर करू शकतो, याविषयी सविस्तर सांगितले. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तसेच बँक खात्यामधून होणारी पैशांची चोरी या विषयांवर मान्यवरांनी उपस्थितांना अनभिज्ञ गोष्टी विषद केल्या.
यावेळी उपस्थितांमध्ये आपल्याबाबतीत असेही होऊ शकते, अशा प्रतिक्रिया उमटल्या. असे घडल्यास काय काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याचा उहापोह करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये NCCRP पोर्टल, MRN पोर्टल, GRM पोर्टल, आणि आपला मोबाईल सुरक्षित करण्यासाठी MKVACH2 हे पोर्टल घ्यावे जेणेकरून आपला मोबाईल स्कॅन करता येईल. आपल्या बाबतीत जर असा सायबर गुम्हा घडला तर 1930 या नंबरवर फोन करावा आणि आपली तक्रार तिथे दाखल करावी आणि 112 नंबर ला फोन करून तक्रार केल्यास पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला सहकार्य करतील, असे प्रतिपादन मान्यवर मार्गदर्शक यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाला रत्नागिरीमधील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. श्री. जाधव आणि श्री. कांबळे यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल उपस्थित ज्येष्ठांनी कृतज्ञता आणि समाधान व्यक्त केले. यानंतर श्रीमती सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button