
मतदार नोंदणीला १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्रभर सध्या जोरात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ बाबत निवडणूक आयोगाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी दिली आहे. जर तुमचे मतदार यादीत नाव नोंदवायचे राहिले असेल किंवा नावात काही दुरुस्ती करायची असेल, तर आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. भारत निवडणूक आयोगाने दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून, या सुधारित वेळापत्रकामुळे जिल्ह्यातील हजारो नवमतदारांना आणि नागरिकांना नावनोंदणी व दुरुस्तीसाठी मोलाची संधी मिळाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांना थेट फायदा व्हावा आणि कोणाचीही धावपळ होऊ नये यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ या चार दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. या शिबिरांमध्ये तुमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बीएलओ प्रत्यक्ष उपस्थित राहून नवीन मतदारांचे फॉर्म भरून घेणे, यादीतील नावांची पडताळणी करणे आणि दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे ही कामे पूर्ण करून घेतील.
ज्या मतदारांना प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीनंतर Unmapped किंवा Logical Discrepancy च्या सुनावणीच्या नोटिसा मिळाल्या आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा नागरिकांना आता कोणत्याही सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष रांगेत उभे राहाण्याची किंवा उपस्थित राहाण्याची अजिबात आवश्यकता नाही. बीएलओ स्वतः अशा मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करतील. इतकेब नाही तर नागरिक ही कागदपत्रे ऑनलाईन अथवा व्हॉट्सऍपवरूनही सहज पाठवू शकतात. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन सुनावणी घेतली जाईल, ज्यासाठी घरातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते. या संपूर्ण विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि आपले मतदानाचे कर्तव्य बजाविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र नवमतदारांनी व नागरिकांनी या वाढीव मुदतीचा आणि विशेष शिबिरांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




