जिल्ह्यात ५६१ गावांचा ड्रोन सव्र्व्हे; मार्च २०२७ पर्यंत होणार डिजिटल नकाशे


ग्रामीण भागातील जमिनींचे अचूक सर्वेक्षण करून मालमत्ता धारकांना अधिकृत हक्क मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागातर्फे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तब्बल ५६१ गावांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, विभागाचा विस्तार आणि कामाचा वाढता व्याप लक्षात घेता नव्या आकृतीबंधानुसार प्रशासनात महत्त्वाची विशेष उपाधिक्षक भूमिअभिलेख गावठाण आणि निवासी अधिक्षक भूमिअभिलेख ही नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
ड्रोन सर्व्हेक्षणामुळे ग्रामीण भागातील मिळकतींचे डिजिटल सर्व्हे नकाशे तयार होणार असून, सीमांविषयीचे वाद कायमचे मिटण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय स्तरावर झालेल्या या पदनिर्मितीमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होणार असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावठाण भागांचे आधुनिक ड्रोनद्वारे मापन केले जात आहे. आतापर्यंत ५६१ गावांपैकी ३० गावांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून १७० गावांमध्ये ग्राऊंड शूटिंगचे (प्रत्यक्ष जमिनीवरील रेखांकन व पडताळणी) काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचे काम वेगाने सुरू असून, कामातील खंड टाळण्यासाठी आणि तातडीच्या कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मार्च २०२७ ची डेडलाईन गाठण्यासाठी भूमिअभिलेख यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. स्वामित्व योजनेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये प्रवेश करताना भूमिअभिलेख विभागाची पुनर्रचना केली जात असून नवीन आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. या नव्या रचनेमुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button