पोटरीत गोळे का येतात?

कुतूहल : झोपेत पोटरीत अचानक गोळा येणे ही अनेकांना जाणवणारी समस्या आहे. या वेळी पोटरीतील स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे तीव्र वेदना होऊ शकते. काही वेळाने ही वेदनादायक कळ आपोआप कमी होते. पण या मधल्या काळात अस्वस्थता जाणवत राहते.

झोपेत पोटरीत गोळा येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे स्नायूंमध्ये निर्माण होणारा थकवा किंवा शरीरातील काही क्षारांचं असंतुलन होणं. या असंतुलनामुळे, तसंच अयोग्य रक्ताभिसरण किंवा पायाच्या स्नायूंमध्ये होणार्‍या रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे स्नायूंना रक्तातील पोषकतत्त्वांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यामुळे स्नायूंना थकवा येतो. अनेकदा धावणं किंवा सायकल चालवणं यासारख्या पायांच्या हालचालींचा समावेश असलेल्या क्रिया अति प्रमाणात केल्यामुळे स्नायूंना थकवा येतो. तसंच दिवसभर जास्त चालणं, खूप वेळ एकाच स्थितीत उभं राहणं, प्रमाणाबाहेर व्यायाम करणं यामुळेही स्नायू थकतात. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळेही स्नायूंवर ताण पडतो आणि स्नायू आकुंचन पावून पायात गोळा येतो.

स्नायूंच्या योग्य व सुसूत्र हालचालीसाठी आपल्या शरीराला आहारातील कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यांच्या क्षारांची म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्सची नितांत आवश्यकता असते. स्नायूंचं आकुंचन-प्रसरण ही प्रक्रिया या इलेक्ट्रोलाइट्सनी दिलेल्या विद्युत संकेतांवर अवलंबून असते. हे संकेत तयार होण्यासाठी आणि योग्य वेळी स्नायूंचं आकुंचन-प्रसरण योग्य पद्धतीने होण्यासाठी हे इलेक्ट्रोलाइट्स शरीराला आवश्यक असतात. स्नायूंच्या आकुंचनासाठी कॅल्शियम अतिशय महत्त्वाचं आहे तर मॅग्नेशियम स्नायू प्रसरणाला मदत करतं. त्यामुळे स्नायू ताठ होणं, गोळा येणं टळतं.

मेंदूकडून स्नायूंना मिळणार्‍या संदेशांच्या वहनात मॅग्नेशियम मदत करतं. स्नायूंना हालचालीसाठी ज्या स्वरूपात ऊर्जा लागते त्या स्वरूपात तिचा उपयोग होण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. मॅग्नेशियम स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल साचण्याचं प्रमाण कमी करतं ज्यामुळे स्नायू लवकर थकत नाहीत व वेदना कमी होतात. पोटॅशियम आणि सोडियम हे दोन्ही घटक पेशींच्या आतील आणि बाहेरील विद्युत फरक टिकवून ठेवतात. त्यामुळे स्नायूंना योग्य तो संदेश मिळतो व काम करणं सुलभ जातं. या क्षारांचं संतुलन बिघडल्यास म्हणजेच त्यांची शरीरात कमतरता भासल्यास स्नायूंच्या आकुंचन प्रसरणात अडथळा निर्माण होतो व पोटरीत गोळा येतो.

शरीरात पाण्याची कमतरता, झोपण्याची चुकीची पद्धत किंवा इतर काही वैद्यकीय समस्या, हीसुद्धा झोपेत पोटरीत गोळा येण्याची आणखी काही कारणं आहेत. पुरेसं पाणी प्यायल्यास, केळी, नारळपाणी, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, कडधान्य इत्यादींचा समावेश आपल्या आहारात असल्यास पोटरीत गोळे येण्याची समस्या कमी होऊ शकते.

– प्रज्ञा नाडकर्णी

मराठी विज्ञान परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button