
पुलावरील झाडे-झुडपांमुळे संरचनेला धोका
सावर्डेतील उदेगवाडी मार्गावरील पुलाची तातडीने साफसफाई करण्याची मागणी
सावर्डे (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उदेगवाडी मार्गावरील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या पुलावर मोठ्या प्रमाणात उंबर, पिंपळ यांसह विविध झाडे आणि झुडपे वाढली आहेत. पुलाच्या कठड्यांमध्ये तसेच संरक्षक भागांमध्ये झाडांची मुळे शिरल्याने पुलाच्या संरचनेला धोका निर्माण झाला असून, तातडीने साफसफाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
उदेगवाडी, कासारवाडी तसेच परिसरातील विविध वाड्यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, पुलावर वाढलेली झाडे-झुडपे दिवसेंदिवस मोठी होत असल्याने पुलाच्या संरचनेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
झाडांची मुळे पुलाच्या भिंती, कठडे आणि काँक्रीटच्या संरक्षक भागांमध्ये शिरल्याने भविष्यात तडे जाण्याची तसेच पुलाचे आयुर्मान कमी होण्याची भीती आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास पुलाचे मोठे नुकसान होऊन वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो.
या समस्येची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक व चित्रपट विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सावर्डेचे माजी सदस्य देवराज गरगटे यांनी समाजसेवक व उद्योजक रुपेश कोकाटे यांच्यासमवेत केली. पाहणीदरम्यान पुलाच्या कठड्यांमध्ये व बाजूच्या संरक्षक भागांमध्ये झाडांची मुळे खोलवर गेल्याचे निदर्शनास आले.
यावेळी गरगटे यांनी संबंधित जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले. तसेच जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम यांच्या निदर्शनासही हा प्रकार आणून पुलावरील उंबर, पिंपळ व इतर झाडे मुळासकट हटविण्याची मागणी केली. पुलाची संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तसेच नियमित देखभाल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
“पुलावरील वाढलेल्या झाडांमुळे पुलाला अक्षरशः वेढा पडला आहे. ही झाडे वेळेत हटवली नाहीत तर भविष्यात पुलाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून पुलाला मोकळा श्वास द्यावा,” अशी मागणी देवराज गरगटे व रुपेश कोकाटे यांनी केली.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, पुलाची तातडीने साफसफाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




