मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदीच्या वादातून सप्लायरवर जीवघेणा हल्ला


लोखंडी फायटरने बेदम मारहाण; चाकूच्या हल्ल्यात कपाळावर गंभीर दुखापत; दोघांविरोधात गुन्हा दाखल


रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. मच्छी खरेदी करणाऱ्या रज्जाक हमजा साब (४३, रा. शिवाजीनगर) यांच्यावर लोखंडी फायटर आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शफिक महमद शरीफ दर्वे (४५) आणि अब्दुल्ला शफिक दर्वे (२२, दोघेही रा. मिरकरवाडा) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक साब हे मिरकरवाडा जेटीवर जमीर होडेकर आणि महंमद भाटकर यांच्याकडून मच्छी खरेदी करत होते. यावेळी शफिक दर्वे आणि अब्दुल्ला दर्वे तेथे आले. ‘तुला सांगितले होते, तरीही मिरकरवाड्यात मच्छी खरेदी करण्याची हिंमत कशी केलीस?’ असे म्हणत त्यांनी रज्जाक यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.

वाद वाढल्यानंतर शफिक दर्वे याने रज्जाक यांना पकडून ठेवले, तर अब्दुल्ला याने लोखंडी फायटरने त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर आणि पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत रज्जाक खाली कोसळल्यानंतर शफिक याने पॅन्टमध्ये लपवलेला चाकू बाहेर काढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

स्वतःचा बचाव करण्यासाठी रज्जाक यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चाकूचा वार त्यांच्या कपाळावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित साक्षीदार आणि नागरिकांनी हस्तक्षेप करून रज्जाक यांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने रत्नागिरी शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील पोलीस चौकी अंमलदारांनी नोंद घेतल्यानंतर रज्जाक हमजा साब यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी शफिक दर्वे आणि अब्दुल्ला दर्वे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button