
रत्नागिरीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा मूकमोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची व ईव्हीएम बंद करण्याची मागणी
रत्नागिरी:- भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून मत चोरी होत असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा हा भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या ज्यात महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी. या गोंधळास जबाबदार धरून मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
पारदर्शकता जपण्यासाठी ईव्हीएम ऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे.
या मूक मोर्चामध्ये राजापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, लांजा तालुकाध्यक्ष राजू राणे, राजापूर नगर परिषदेचे नगरसेवक सिद्धांत जाधव, अफरोज झारी, शबाना मुल्ला, राजापूर नगर वाचनालयाचे माजी अध्यक्ष देवदत्त वालावलकर, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रदीप भाटकर, शैबाज खलिफे, राजापूर काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर, रघुनाथ आडिवरेकर, अनंत फणसे, अदनान खलिफे, हारून साठी, अशपाक कादरी, सुरेश कातकर, जैनुल सारंग, कौशल फाळके, बजाज झारी, सईदा झापडेकर, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, असलम शेख – सोशल मिडिया तालुकाअध्यक्ष, साखरप्याचे विश्वनाथ किल्लेदार, काशीराम वाजे, रवींद्र गुरव, संजय कांबळे, दिलीप मोहिते, अंजली यादव, सुनील माईन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



