मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर अवतरले जंतर मंतर; ज्ञानेशकुमारांच्या विरोधातील घोषणा अन् फलकांनी वेधून घेतले लक्ष, तिरंगा हाती घेवून शिवसैनिक रस्त्यावर!

Thackeray’s march… discussion across the country : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी आझाद मैदानावर काढलेल्या गर्जना मोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांचे नेते मोर्चामध्ये सामील झाले होते. गर्जना मोर्चामुळे फॅशन स्ट्रीटवर दिल्लीचे ‘जंतर मंतर’ अवतरल्याचा भास होत होता.

मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग होता. सकाळी दहा वाजता मोर्चेकरी जथ्याने फॅशन स्ट्रीटवर पोहचत होते. मोर्चा पक्षीय नसल्याने तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन शिवसैनिक आले होते. अनेकांच्या हाती ज्ञानेश कुमारांच्या निषेधाचे फलक होते. ‘गली गली में हल्ला है ज्ञानेशकुमार दल्ला है’, ‘व्होट चोर गद्दी छोड’, ‘गळ्यात बांधली भाजपची दोरी, ज्ञानेशकुमारने केली मतांची चोरी’ अशा घोषणा शिवसैनिक देताना दिसत होते. ‘ठाकरेंचा मोर्चा… देशभर चर्चा’, या घोषणेचे टी-शर्ट अनेक शिवसैनिकांनी परिधान केले होते.

सीएसएमटी, फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमा, फडके चौक, महापालिका मार्ग परिसरातील सर्व दुकाने आज पोलिसांनी बंद ठेवली होती. महापालिका मार्गावर प्रेस क्लबसमोर भर रस्त्यात व्यासपीठ उभारण्यात आले होते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. अल्पसंख्याक समुदायातील कार्यकर्ते व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. उन्हाचा कडाका असल्याने अनेकांना भोवळ आली. कार्यकर्त्यांसाठी जागोजागी पिण्याचे पाणी ठेवले होते. दुपारी १२ वाजता नेत्यांच्या भाषणांना प्रारंभ झाला.

आयोग भाजपचा ‘ब’ संघ:

‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी केली. राज्यातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप जिंकली आहे. आयोगाच्या विरोधात देशभर संताप आहे, असा दावा देशमुख यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा ‘ब’ संघ असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत २ कोटी बोगस मतदार घुसवण्यात आले, ज्यामुळे भाजप सत्तेत आली. यापुढे मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. दिल्लीतल्या हुकूमशहाचा पहिला पराभव याच मराठ्यांच्या क्रांतीभूमीतून होईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

आयोग सरकारचा गुलाम :

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे यांचे भाषण झाले. देशभर भाजपविरोधात लाट असूनही निवडणुका मात्र ते कशा जिंकतात, असा सवाल त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेवर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवड समितीमधून बाहेर काढल्यापासून आयोग केंद्र सरकारचा गुलाम बनला आहे. महाविकास आघाडी २०२४ च्या निवडणुकीत पराभूत होऊ शकत नव्हती, मात्र मतचोरी करून भाजपने सत्ता मिळवली. ज्ञानेश कुमार हे भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे प्रतीक असून लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन थोरात यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत, मनसेचे अमित ठाकरे, बाळा नांदगावकर तसेच शेकापचे भाई जयंत पाटील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button