नशामुक्त आणि क्षयरोगमुक्त युवा घडविण्याचा संकल्प

डी.बी.जे. महाविद्यालयाचे आजपासून खेर्डी येथे निवासी शिबिर

चिपळूण : नव कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, दातेवाडी येथे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशा एवं टीबी मुक्त युवा’ हे यंदाच्या शिबिराचे ब्रीदवाक्य असून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, क्षयरोग प्रतिबंध, आरोग्य जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

शिबिरात कायदेविषयक मार्गदर्शन, सूत्रसंचालन कार्यशाळा, सायबर फसवणूक जनजागृती, पत्रकारिता, POCSO कायदा, क्षयरोग प्रतिबंध, जलसंवर्धन आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत.

सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी पत्रकार योगेश बांडागळे यांचे ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

शिबिरादरम्यान आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, बालआरोग्य तपासणी, पथनाट्य, श्रमदान, ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन, तर ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सांगता समारंभ होणार आहे.

विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि ग्रामीण विकासात सक्रिय योगदान द्यावे, हा शिबिराचा मुख्य उद्देश असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button