
मार्कंडीतील अनधिकृत लोखंडी कंटेनर पालिकेने घेतले ताब्यात!
यतीन कोवळे यांचे आमरण उपोषण मागे; अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू
चिपळूण : मार्कंडी येथे २४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत लोखंडी कंटेनरप्रकरणी अखेर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा संबंधित कंटेनरचा पंचनामा करून तो पालिकेने ताब्यात घेतला. तसेच अज्ञात व्यक्तींविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे लेखी पत्र प्रशासनाने दिले. त्यानंतर यतीन कोवळे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
मार्कंडी येथील सर्व्हे क्रमांक ५९/२क तसेच सिटी सर्व्हे क्रमांक २६३३ अ, २६३४, २६३५ आणि २६३६ मधील सुमारे ८५ चौरस मीटर जागा शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित आहे. एप्रिल २०२० मध्ये नगरपरिषदेने या जागेवरील अनधिकृत खोके हटवून जागा मोकळी केली होती. मात्र, ३१ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याच जागेवर ४५ बाय १५ फुटांचा, पाच रोलिंग शटर असलेला लोखंडी कंटेनर आणून ठेवण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कंटेनरखाली पक्के बांधकामही करण्यात आले.
या प्रकरणी नगरपरिषदेने ११ आणि १३ ऑगस्ट रोजी संबंधितांना नोटिसा बजावून सात दिवसांत कंटेनर हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही कारवाई न झाल्याने यतीन कोवळे यांनी गुरुवारी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर उपमुख्याधिकारी अनंत मोरे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, सचिन शिंदे आदी अधिकाऱ्यांनी कोवळे यांच्याशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र देताना संबंधित लोखंडी पत्र्याचे गाळे, छत आणि रोलिंग शटरसह रेडिमेड स्ट्रक्चरचा पंचनामा करून ते नगरपरिषदेने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पालिकेने प्रत्यक्ष कारवाई करून लेखी आश्वासन दिल्यानंतर यतीन कोवळे यांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे मार्कंडीतील आरक्षित जागेवरील अनधिकृत कंटेनरचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे.




