
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यंदाही हवेतच विरला!भारतीय वंशाच्या नावी पिल्ले यांना शांततेचं नोबेल जाहीर*
भारतीय वंशाच्या नावाथेनम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
त्यामुळे यंदाही ‘मी ८ युद्ध थांबवली’ असं म्हणत शांततेच्या नोबेल पारितोषिकावर दावा सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यंदाही हवेतच विरला आहे. पाकिस्तानने याहीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस केली होती. मात्र, नॉर्वेच्या नोबेलविषयक समितीने सर्व निकषांचा विचार करून नावी पिल्ले यांच्या नावाची शांततेच्या नोबेलसाठी घोषणा केली आहे. गेल्या वर्षीचं शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला होता.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सोशल पोस्ट…
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल पारितोषिक न मिळाल्यामुळे खुद्द त्यांच्यासोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचाही भ्रमनिरास झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शांततेच्या नोबेल पारितोषिकासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळावं, अशी आशादेखील व्यक्त करण्यात आली होती.
“राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेळीच केलेल्या मध्यस्थीमुळे भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरले व युद्धबंदी साध्य झाली जी आजतागायत अस्तित्वात आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या पारितोषिकासाठी शिफारस केली आहे. आम्हाला अशी प्रामाणिक आशा आहे की दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करणे व संघर्ष टाळणे यासंदर्भात राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची यंदा योग्य ती दखल घेतली जाईल”, असं शाहबाज शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
नावी पिल्ले यांच्याबाबतच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी..
१. दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला: नावी पिल्ले यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४१ रोजी आफ्रिकेतल्या डर्बनमध्ये झाला. त्यांचे पालक तामिळ वंशाचे होते. १९९५ साली नावी पिल्ले दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात पहिल्या कृष्णवर्णीय न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या होत्या.
२. वर्णभेदविरोधी आंदोलकांची वकिली: १९६७ साली नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेतल्या नेतल प्रांतात वकिली सुरू करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या. त्यांनी वर्णभेदविरोधी आंदोलकांचे खटले लढले. तसेच, राजकीय कैद्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीसाठीही लढा दिला.
३. रवांडातील नरसंहार प्रकरणात ऐतिहासिक निकाल: रवांडासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद न्यायाधीश म्हणून काम करताना नावी पिल्ले यांनी ऐतिहासिक ठरलेल्या अकायेसू प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये बलात्कार व लैंगिक शोषण हेदेखील नरसंहारच ठरतात, असं या निकालाने मान्य केलं.
४. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयुक्त: नावी पिल्ले यांनी सप्टेंबर २००८ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून काम पाहिलं आहे. जगभरातील मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी कायमच आग्रही भूमिका घेतली आहे.
५. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण: नावी पिल्ले यांचं शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झालं आहे. १९८२ साली त्यांनी कायद्याचं पदव्युत्तर पदविका शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९८८ साली डॉक्टर ऑफ ज्युरिडिकल सायन्स ही पदवी मिळवली. शिवाय, महिलांच्या अधिकारांसाठी लढा देणारी ‘इक्वॉलिटी नाऊ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या त्या सहसंस्थापिकादेखील आहेत.




