
कमी पाऊस पडल्याने रत्नागिरी शहरात ’पाणीकपातीचे’ संकट
अल निनोचा प्रभाव आणि यंदाचे कमी पर्जन्यमान पाहता रत्नागिरी शहरात पाणी कपाल अटळ बनणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दर सोमवारी एक दिवस संपूर्ण पाणी कपात करण्यासंदर्भात नगरपरिषदेकडून गांभीयनि विचार सुरू झाला आहे. याबाबत लवकरच पाणी कपातीचा अंतिम निर्णय विशेष बैठकीद्वारे घेतला जाणार आहे. अनधिकृत नळ जोडण्या तोडणे आणि गाड्या धुण्याच्या रॅम्पना नगर परिषदेमार्फत सुरू असलेला पाणीपुरवठा खंडित करण्याबाबतही सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली.
सभेच्या सुरुवातीला यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडल्याबद्दल सभागृहाने समाधान व्यक्त केले. विसर्जनानंतर मांडवी समुद्रि्कनारी वाहून आलेल्या श्रींच्या मूर्तीचे दुसर्या दिवशी पुनर्विसर्जन करणारे मांडवीतील स्थानिक तरुण आणि नगरसेवक बंटी कीर यांचे सभागृहाकडून विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर पाणी पुरवठा सभापती निमेश नायर यांनी शहरातील दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
अल निनोमुळे यंदा अत्यल्प पाऊस पडला असून भविष्यात पावसाची खात्री नाही. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असून दर सोमवारी एक दिवस पाणी कपात लागू करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. यावर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी पर्याय सुचवत एकाच दिवशी संपूर्ण पाणी बंद ठेवण्याऐवजी दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेतून १० मिनिटांची कपात करावी. तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार नाही आणि पाण्याची बचतही होईल, असे सांगितले. मात्र यावर लगेचच अंतिम निर्णय न घेता काही दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेण्याचे सभागृहाने ठरवले. परंतु नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.




