
मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवेला वेग; सात-आठ तासांत कोकण प्रवासाचे नियोजन
विजयदुर्गचा प्रयोग अपयशी; तिकीट दर परवडणारे ठेवण्याचे आव्हान
मुंबई : मुंबई ते कोकण प्रवास जलद आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आता मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. या सेवेत विजयदुर्ग आणि मालवण येथे थांबे प्रस्तावित असून, प्रवासाचा कालावधी सुमारे सात ते आठ तास ठेवण्याचे नियोजन आहे.
यापूर्वी १ मार्च २०२६ रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी तिकिटांचे दर ३ ते ९ हजार रुपये, तर वाहनांसाठीही तुलनेने अधिक शुल्क असल्याने सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. महिन्याभरात झालेल्या १२ फेऱ्यांत केवळ ८९४ प्रवाशांनी आणि १५४ वाहनांनी प्रवास केला.
दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला ‘एम टू एम प्रिन्सेस’ या बोटीची चारपैकी तीन इंजिने निकामी झाल्याने सेवा बंद पडली. त्यानंतर ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली असून, प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करण्याची भूमिका सागरी मंडळाने घेतली.
आता मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवेसाठी व्यवहार्यता तपासणी सुरू आहे. चार कंपन्यांनी या मार्गावर सेवा देण्यास उत्सुकता दर्शवली असून, निविदा प्रक्रियेतून कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. वेंगुर्ला बंदरातील जेट्टीचे कामही सुरू असून सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
रो-रो सेवा सर्वसामान्यांना परवडावी यासाठी तिकीट दर कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्यवहार्यता अभ्यास, निविदा आणि कंपनी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यास किमान एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-कोकण प्रवासासाठी हा जलद जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मात्र मुंबई-विजयदुर्ग सेवेचा अनुभव पाहता तिकीट दर, प्रवाशांना मिळणारी सुविधा आणि सेवेची विश्वासार्हता हे मुंबई-वेंगुर्ला रो-रोच्या यशाचे महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.




