
कोकण रेल्वेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
३० पदांसाठी ६०० ते ७०० अर्ज; कोकण अन्याय निवारण समितीचा आक्षेप
चिपळूण : कोकण रेल्वेमध्ये ऑफिस बॉय, हेल्पर आणि खलाशी या पदांच्या ३० जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कोकण अन्याय निवारण समितीने केली आहे. या भरतीसाठी परप्रांतीय उमेदवारही मुलाखतीसाठी येत असल्याचा दावा समितीने केला आहे.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुरू असलेल्या या भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ६०० ते ७०० अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. रत्नागिरी येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात सध्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत.
या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे. कोकणातील पात्र उमेदवार उपलब्ध असताना बाहेरील उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘इतर राज्यांमध्ये रेल्वेच्या भरती प्रक्रिया होत असताना कोकणातील बेरोजगारांना पुरेशा संधी मिळत नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वेतील रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे,’ अशी भूमिका मुकादम यांनी मांडली.
दरम्यान, भरती प्रक्रियेवर समितीचे लक्ष असून स्थानिक उमेदवारांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.




