
MRI मशीनने उघड केला ३३ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोटाचा ‘ पुरावा’!
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातून बचावलेल्या संगमेश्वरच्या सुधीर मोहितेंच्या शरीरातून धातूचा तुकडा शस्त्रक्रियेद्वारे बाहेर
एखाद्या घटनेची आठवण मनात राहते, पण तब्बल ३३ वर्षे तिची निशाणी शरीरातच राहिली असेल, तर? संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील सुधीर तुकाराम मोहिते (५७) यांच्या बाबतीत अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातून बचावलेल्या मोहिते यांच्या शरीरात स्फोटातील धातूचा तुकडा तब्बल तीन दशकांहून अधिक काळ राहिल्याचे नुकतेच उघड झाले.
मोहिते यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेनस्ट्रोक आल्याने ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांची MRI तपासणी सुरू केली. मात्र, तपासणी सुरू असतानाच मशीनमधून अचानक विचित्र आवाज येऊ लागल्याने डॉक्टरांनी तातडीने MRI थांबवून मोहिते यांना बाहेर काढले.
MRI मशीनमध्ये अडथळा नेमका कशामुळे निर्माण झाला, याचा शोध घेताना डॉक्टरांच्या लक्षात मोहिते यांच्या ओठाच्या वरच्या बाजूला असलेली एक गाठ आली. अधिक तपासणी केली असता ही गाठ नसून शरीरात अडकलेला धातूचा तुकडा असल्याचे स्पष्ट झाले.
३३ वर्षांपूर्वीचा स्फोट पुन्हा समोर आला
या धातूच्या तुकड्याचा इतिहास समोर आल्यानंतर १२ मार्च १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्या दिवशी सुधीर मोहिते हे वरळीतील पासपोर्ट कार्यालयासमोरील मॉडर्न हॉटेलजवळ १७२ क्रमांकाच्या बसने प्रवास करत होते. त्याच परिसरात झालेल्या भीषण स्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर असंख्य जण जखमी झाले.
स्फोटात मोहिते यांच्या गालाला दुखापत झाली होती. त्यावेळी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार व ड्रेसिंग करण्यात आले आणि त्यानंतर ते घरी परतले. मात्र, स्फोटातील आरडीएक्समिश्रित धातूचा एक तुकडा त्यांच्या शरीरातच राहिला, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
विशेष म्हणजे, या तुकड्यामुळे गेल्या ३३ वर्षांत मोहिते यांना कोणताही त्रास जाणवला नाही. मात्र, ब्रेनस्ट्रोकच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या MRI तपासणीमुळे त्यांच्या शरीरात दडलेली तीन दशकांपूर्वीची ही निशाणी अचानक समोर आली.
शस्त्रक्रियेतून धातूचा तुकडा बाहेर
११ सप्टेंबर रोजी हिंदुजा रुग्णालयातील डॉ. कुमार ऋषी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून हा धातूचा तुकडा मोहिते यांच्या शरीरातून बाहेर काढला. पुढील वैज्ञानिक संशोधन आणि तपासणीसाठी हा तुकडा पाठवण्यात आला आहे.
मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या सुधीर मोहिते यांच्या शरीरात तब्बल ३३ वर्षे दडून राहिलेली ही निशाणी आता बाहेर आली आहे. एका नियमित वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील त्यांच्या वैयक्तिक आठवणीला जणू शरीरातूनच पुरावा मिळाला, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संगमेश्वर तालुक्यातही मोठी चर्चा निर्माण झाली आहे.



