
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत रामदास कदम यांचे गणरायाला साकडे
जामगे येथील योगेश कदम यांचा गणेशोत्सव ठरला जिल्ह्याचा उत्सव; ३५ वर्षांपासून भजन पथकांना मोफत वाद्यसाहित्य, सर्वधर्मसमभावाचे दर्शन
खेड : तालुक्यातील जामगे येथील योगेश कदम यांचा गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याचा उत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो भाविक तसेच भजन, लाखडी नृत्य आणि विविध सांस्कृतिक पथके जामगे येथे दाखल होत असतात. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच सामाजिक एकोपा आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भजन पथकांना ढोलकी, पखवाज, वीणा, टाळ आदी वाद्यसाहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. तरुणांनी देवळात भजन- कीर्तनात सहभागी व्हावे आणि व्यसनांपासून दूर राहावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गेल्या २५ वर्षांपासून या गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जामगे येथील या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मसमभाव. यंदाही मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. धर्म, जात-पंथाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करण्याची ही परंपरा सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करणारी आहे. जामगे येथे दिसणारा हा एकोपा संपूर्ण महाराष्ट्राने अनुकरण करण्यासारखा असल्याचे रामदास कदम यांनी नमूद केले.
दरम्यान, कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी आपल्या गावी दाखल होतात. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गणेशभक्तांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईहून कोकणात साधारण साडेतीन तासांत पोहोचणाऱ्या प्रवासाला सध्या तब्बल १२ तास लागत असल्याची खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली.
मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास आता संपावा आणि कोकणवासीयांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी गणरायाच्या चरणी साकडे घालत असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून, कोकणवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर संबंधितांना सद्बुद्धी मिळावी आणि लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन मुंबईहून अवघ्या तीन-साडेतीन तासांत कोकणात पोहोचता यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे करण्यात आली.
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि कोकणाच्या विकासाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला जात असल्याने जामगे येथील योगेश कदम यांचा गणेशोत्सव यंदाही चर्चेचा विषय ठरला आहे.




