
परवाना नसतानाही पर्ससीन मासेमारी; मत्स्य विभागाची धडक कारवाई, चार मिनी नौका ताब्यात
काळबादेवी किनाऱ्यापासून अवघ्या ४ ते ५ नॉटिकल मैलांवर बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे उघड
रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू होऊन अवघे पाच दिवस होत असतानाच राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई केली आहे. काळबादेवी किनाऱ्यापासून अवघ्या ४ ते ५ नॉटिकल मैलांच्या अंतरावर या नौका मासेमारी करताना आढळून आल्या.
कारवाई करण्यात आलेल्या चार नौकांपैकी तीन नौका मिरकरवाडा येथील, तर एक नौका काळबादेवी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू होताच राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने ही धडक कारवाई केली. ‘शारदा’ या गस्ती नौकेद्वारे समुद्रात नियमित गस्त सुरू असताना काळबादेवी किनाऱ्यासमोर या चार मिनी पर्ससीन नौका मासेमारी करताना निदर्शनास आल्या.
राज्याच्या सागरी हद्दीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या चारही नौकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, या प्रकरणाची सुनावणी आयुक्तांच्या न्यायालयात होणार आहे. मत्स्य विभागाच्या या कारवाईमुळे किनारपट्टीवरील बेकायदा पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




