
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल!
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानियांची पोस्ट काय?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. तीव्र डिहायड्रेशन, व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आत्ताच डॉ. भन्साळी यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ते स्टेबल आहेत असे त्यांनी सांगितले. अण्णांनी आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला. त्यांना लवकरात लवकर बरे वाटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. तीव्र डिहायड्रेशन, व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर डॉ. गौतम भंसाली यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आत्ताच डॉ भंसाली यांच्याकडे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.…
बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात अण्णा हजारेंवर उपचार सुरु
अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करत असून, या चाचण्यांच्या अहवालानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे. अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
२०११ मध्ये अण्णा हजारेंना देशभरात ओळख मिळाली
२०११ मध्ये ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनामुळे अण्णा हजारे देशभर ओळखले गेले. राळेगणसिद्धीसारख्या एका गावाला आदर्श गावात बदलण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. नुकतंच त्यांनी ‘नीट’ पेपर लीक प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. अण्णा हजारे लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील त्यांचे चाहते आणि शुभचिंतक प्रार्थना करत आहेत.




