वडगाव – खेड एस.टी. बसला अपघात : प्रवासी सुखरूप

खेड : तालुक्यातील वडगाव – खेड मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसला रविवारी दुपारी अस्तान – चाटव सीमेजवळ अपघात झाला. ( क्रमांक – एम एच १४ बीटी २७५६ ) ही एस.टी. बस अपघातग्रस्त झाली. अपघाताची घटना रविवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड आगाराची वडगाव – खेड एस.टी. बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ असताना अस्तान – चाटव सीमेजवळ पुलाच्या अलीकडे अचानक अपघात झाला. बस अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या बसमध्ये एकूण सहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेला नसल्याचे समोर आले आहे. बसमधील सर्व सहा प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एस.टी. प्रशासनाकडूनही घटनास्थळाची माहिती घेण्यात आली. दरम्यान, बसचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
एस.टी. प्रशासनाकडून अपघाताची कारणे आणि बसच्या नुकसानीबाबत अधिकृत माहिती घेतली जात आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button