एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अपघातानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक

चिपळूण : खांदाड-गवळवाडी परिसरात आंबडस गावाच्या सीमेजवळ कासई-सापिरली आणि चोरवणे या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका पक्षाच्या वतीने करण्यात आली.

तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये आणि युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांना निवेदन देण्यात आले.

अपघातातील कासई-सापिरली बसचा चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. मात्र, संबंधित चालकाच्या वैद्यकीय अहवालात मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.

दोन्ही बसची तांत्रिक तपासणी, चालकांच्या ड्युटी रेकॉर्डची चौकशी तसेच चिपळूण तालुक्यातील अपघातप्रवण मार्गांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यावर अपघातप्रवण मार्गांचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन एसटी प्रशासनाने दिले.

या अपघातात एकूण २४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून त्यांच्या उपचाराचा खर्च एसटी महामंडळाकडून करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी, जुन्या एसटी स्टँड परिसरातील अनधिकृत पार्किंग तसेच डी.बी.जे. महाविद्यालयासमोरील एसटी थांबा सुरू करण्याच्या मागणीवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, उपशहर प्रमुख राजन खेडेकर, राजू विखारे, विभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, संतोष मिरगल, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम व विभाग प्रमुख राहुल गुरव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button