सावर्डेत गणेशोत्सवपूर्व नागरी समस्यांवर चर्चा; अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक

सावर्डे (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावर्डे परिसरातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी सावर्डे ग्रामपंचायत, सावर्डे व्यापारी संघटना आणि संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.

बैठकीत सावर्डे बाजारपेठेतील रस्त्यांची दुरुस्ती, महामार्गावरील आरती स्वीटसमोरील धोकादायक खड्ड्यावर तातडीने उपाययोजना, ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचे ऑडिट, सर्व्हिस रोडवरील तुटलेले गटार स्लॅब, वाढलेले गवत, खड्डे व उखडलेले डांबरीकरण याबाबत चर्चा करण्यात आली.

महामार्गावरील पथदिव्यांची अनियमितता, आवश्यक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था तसेच बसस्थानकातील वर्षभरापासून मोडकळीस आलेल्या पिकअप शेडच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. महामार्गाचे ठेकेदार प्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, एसटी थांब्यांची निश्चिती, वाहतूक नियोजन आणि गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा झाली.

बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, ग्रामपंचायत प्रशासन व अन्य शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पं. समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, माजी सरपंच सौ. समीक्षा बागवे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी, पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात सावर्डे परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button