काँग्रेसचा अभ्यासू चेहरा हरपला; ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी एक वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसने अभ्यासू, संयमी आणि वैचारिक भूमिका ठामपणे मांडणारा ज्येष्ठ नेता गमावला आहे.रत्नाकर महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आणि सामाजिक प्रश्नांबाबतची बांधिलकी यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कार्याची वाट निवडली. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव होता.

समाजवादाबरोबरच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनाही त्यांनी आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व दिले.देशातील राजकीय उलथापालथीच्या काळातही महाजन यांनी आपली वैचारिक भूमिका सोडली नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रियपणे काम केले. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. संघर्षाचा हा अनुभव त्यांच्या पुढील सार्वजनिक जीवनावरही उमटला.

सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपद तसेच राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button