
१०५ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य!
कापडगाव जि.प. शाळेत सामाजिक बांधिलकीतून पी.टी. ड्रेसचे वाटप; युवा वर्गाचा स्तुत्य उपक्रम

कापडगाव : प्रतिनिधी
ज्या समाजाने आपल्याला घडवले, त्या समाजासाठी काहीतरी देणे लागते, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कापडगाव येथील सामाजिक व शिक्षणप्रेमी युवा वर्गाने पुढाकार घेत जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा, कापडगाव नं. १ येथील तब्बल १०५ विद्यार्थ्यांना नियमित वापरासाठी पी.टी. ड्रेसचे वाटप केले. विद्यार्थ्यांना ड्रेस मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि उत्साहाचे वातावरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
बौद्धजन हितवर्धक संघ, कापडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व शिक्षणप्रेमी युवा वर्गाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेच्या नियमित वेळापत्रकानुसार, विशेषतः शनिवारी नियमित ड्रेसप्रमाणे पी.टी. ड्रेसचा वापर करता येणार आहे. त्यामुळे शालेय उपक्रम, पी.टी. तसेच विविध क्रीडा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना एकसमान आणि शिस्तबद्ध पोशाख मिळणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाप्रेम आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने युवा वर्गाने हा उपक्रम हाती घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी आणि युवा पिढीने अशा प्रकारे पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमास विस्तार अधिकारी डॉ. श्री. डी. बी. सोनपुर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळ, व्यायाम आणि विविध शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमासाठी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अँड सिव्हिल इंजिनिअर श्री. रोशन कांबळे यांनी प्रमुख पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
यावेळी बौद्धजन हितवर्धक संघाचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी सैनिक आयु. श्री. संतोषजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच श्री. रोशन कांबळे, जि.प. रत्नागिरीचे कनिष्ठ अभियंता श्री. श्रेयस कांबळे व श्री. मंदार कांबळे यांनी शाळेविषयी असलेले प्रेम, ऋणानुबंध आणि सामाजिक बांधिलकी याबाबत आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्रजी मांडवकर, उपाध्यक्ष सौ. शिवानी कोत्रे, तसेच सदस्य सौ. वर्षा पेजे, सौ. आदिती पेजे व सौ. सिडी कोत्रे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप कोत्रे सर यांनी सामाजिक व शिक्षणप्रेमी नवयुवक वर्गाला प्रेरणा व प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी अनिकेत कांबळे, विवेक कांबळे, शुभम कांबळे, संकेत कांबळे, मंगेश कांबळे, मंदार कांबळे, रोहन कांबळे, तन्मय कांबळे, अनिस कांबळे, सतीश कांबळे, श्रेयस कांबळे, नयन कांबळे, भूषण पवार व सौरभ कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. विलास सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. किनरे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ तसेच उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.“शाळेचा ड्रेस मिळाला, आता आत्मविश्वासाने मैदानात उतरायचे!” या भावनेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद या उपक्रमाचे खरे यश ठरले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम कापडगाव परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.




