
सावर्डेत झाड कोसळल्याने वीजपुरवठा, वाहतूक विस्कळीत
केदारनाथ मंदिर परिसरातील नागरिकांची गैरसोय; भरपावसात महावितरण कर्मचाऱ्यांची तत्परता
सावर्डे : चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावर्डे येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिराजवळ मध्यरात्री मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर मुख्य मार्गही बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
रात्री सुमारे अकराच्या सुमारास हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिर, उदेगवाडी, स्मशानभूमी, शंकर मंदिर तसेच केदारनाथ कॉलनीकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाला. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहनांची ये-जा ठप्प झाली होती.
झाड थेट वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तेजस कुंभार, नितीन कदम, प्रतीक चव्हाण, प्रसाद गुरव, तन्मय बागवे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री भरपावसात आणि अंधारात दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात पूर्ववत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, सकाळी स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणेच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेले झाड हटविण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. वीजपुरवठा पूर्णपणे आणि सुरक्षितरीत्या पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी काम करीत आहेत.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगतची धोकादायक झाडे तसेच वीजवाहिन्यांच्या परिसरातील झाडांची पाहणी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




