रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात अवजड वाहतूक व एसटी वाहतूक बंद, मात्र लहान वाहनांची वाहतूक सुरु


रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात अवजड वाहतूक व एसटी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, मात्र या घाटातून लहान वाहनांची वाहतूक सुरु आहे मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड परिसरात रस्ता खचल्याने आणि रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने घाटमार्ग अद्यापही धोकादायक स्थितीत आहे. त्यातच संरक्षक भिंत दरीत कोसळल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ओझरे खिंडीतील रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. या धोकादायक ठिकाणाच्या दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असल्याने प्रशासनाने तातडीचा उपाय म्हणून या मार्गावरील अवजड वाहतूक व एसटी वाहतूक बंद केली आहे तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होत असून दुरुस्तीच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत.

सध्या रस्त्यावरील भेगा आणि खचलेल्या भागावर प्लास्टिक कागदाचे आच्छादन टाकण्यात आले आहे. वाहनधारकांना धोकादायक भागापासून दूर ठेवण्यासाठी सुमारे एक फूट उंचीचा लांबच लांब सिमेंटचा कट्टा बांधण्यात आला असून, एका बाजूला लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बंदिस्त करण्यात आले आहे. मात्र, हे उपाय तात्पुरते असून घाटमार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार? असा सवाल प्रवासी आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
आंबा घाटातील धोकादायक परिस्थितीमुळे अवजड वाहनांची वाहतूक आधीच बंद करण्यात आली आहे. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२६ पासून आंबा घाट मार्गे रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बससेवाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र अद्याप तरी या मार्गावरून लहान गाड्यांची वाहतूक काळजी घेऊन सुरू ठेवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे

घाटात दाट धुके आणि पावसामुळे रस्त्याचा अंदाज घेणे वाहनचालकांना कठीण जात आहे
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून या काळात मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी आंबा घाट वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता घाटातील धोकादायक भागांची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करणे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button