
खेड नगरपरिषदेची लाखो रुपयांची पाणीपट्टी थकीत
थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी नपा प्रशासनाची धडक मोहीम; आतापर्यंत १५ लाखांहून अधिक वसुली
खेड : खेड नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील थकीत नळपाणीपट्टी वसुलीसाठी लवकरच धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार नोटिसा बजावून तसेच मुदतवाढ देऊनही पाणीपट्टीची थकीत रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर आता कडक कारवाई करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.
नगरपरिषदेकडील माहितीनुसार, शहरातील नळपाणीपट्टीची एकूण थकबाकी सुमारे ४५ ते ५० लाख रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत १५ लाखांहून अधिक रकमेची वसुली झाली आहे. शहरात १,५०० हून अधिक व्यावसायिक व निवासी नळधारक असून, यातील अनेक ग्राहकांकडे पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे.
थकबाकीदारांना पाणीपट्टी भरण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच रक्कम भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली. मात्र, या मुदतवाढीलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नळजोडणी तोडण्याची कारवाई सुरू होणार असल्याची माहिती मिळताच अनेक थकबाकीदारांनी नगरपरिषद कार्यालयात धाव घेत थकीत पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक रुपयांचा भरणा झाला आहे.
दरम्यान, नळजोडणी तोडण्याच्या मोहिमेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात पाणीपट्टी वसुलीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
थकीत नळपाणीपट्टीची रक्कम तात्काळ भरा
ज्या नळधारकांनी अद्याप पाणीपट्टीची थकीत रक्कम भरलेली नाही, त्यांनी नळजोडणी खंडित होणे तसेच दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी थकीत रक्कम तात्काळ नगरपरिषद कार्यालयात जमा करावी आणि नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.




